पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मुरलीधर मोहोळ यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहे. महापौरांपाठोपाठ आता उपमहापौर सरस्वती शेडगे आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते यांच्यासह सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याने पालिका कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय पुण्यातील दोन खासदार, चार आमदार हे होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरातील राजकीय क्षेत्र धास्तावले आहे. तसेच पालिकेच्या तब्बल 200 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने अनेक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम कमी केले आहेत. त्यासोबत काहींनी तर घराबाहेर पडणेच बंद केले आहे.
दरम्यान, पुण्याचे महापौर मोहोळ यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील आणखी आठ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
राज्यातील अनेक नेते देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे. सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. ते कोरोनावर मात करुन घरी परतेल आहेत. त्यानंतर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती.