पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ यांना आपल्याला पुणे शहराला लवकर बरे करायचे आहे, असा विश्वास देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मी बरा होतोय, आपल्याला आपलं पुणे शहरही लवकरच बरं करायचंय ! लढूया, जिंकूया !, असे म्हणत त्यांनी नागरिकांना धीर दिला आहे.
फेसबुक लाईव्हवरून नागरिकांशी संवाद साधताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे शहर हे माझे कुटुंब आहे आणि याच भावनेतून आमची 15 ते 20 हजार माणसे काम करत आहेत. नर्सेस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी काम करत असताना आमच्या सारख्यांनी घरात बसून काम करणे हे काम नाही. आमचे कर्तव्य म्हणून आम्ही त्यांच्या खाद्यांला खांदा लावून काम करून आमच्या माणसांना प्रोत्साहन देणे ही खरी कामाची संकल्पना व व्याख्या असावी.
आपण या आधी देखील दोन वेळा कोरोना चाचणी केली असल्याचीही माहिती त्यांनी दिली. मात्र तिसऱ्या चाचणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
मोहोळ म्हणाले की, कोरोनाच्या काळात पुणेकरांना सांभाळताना मी खूप काळजी घेतली. मात्र शेवटी ते घडले व मला कोरोना झाला. त्यात माझ्या कुटुंबियांनाही त्रास झाला. आम्ही सगळेजण बरे आहोत. चार दिवसांच्या लक्षणानंतर माझ्यात आता कोणतेही लक्षण नाही. मी बरा होतो आहे. मात्र कोरोना पसरत आहे. ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. पुणेकर काळजी घेत नाही, हे खोडून काढायचे आहे. आता कोरोनावर नियंत्रण मिळवायचे आहे.