‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. कोरोनाचे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करु, असा विश्वास व्यक्त करत या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे, ना. अजित पवार म्हणाले. अत्यंत कमी खर्चात हा प्रकल्प पूर्ण होणार असून पुणे – नाशिक हे अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापले जाईल असेही अजित पवार म्हणाले
सध्याच्या भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार असून या मार्गावरील रेल्वे स्थानकांत व्यवसायासाठी स्टॉल देताना बाधित प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामातही स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषीमालाच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार असल्याचे ना. अजित पवार म्हणाले