मुंबई: वरळीतील डोममध्ये आयोजित ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यांवरून त्यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणावर टीका केली, तसेच स्वतःच्या कुटुंबाची उदाहरणे देऊन भाषिक शिक्षणावरून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.
“मराठीचा पुळका कसा?” – राज ठाकरेंचा भाजपला सवाल
राज ठाकरे यांनी भाजपच्या मराठी प्रेम आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “आम्ही मराठी मीडियात शिकलो, हो शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. होय. मग यांना मराठीचा पुळका कसा?” त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांचे उदाहरण दिले, जे इंग्रजी माध्यमात शिकले होते. “बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घेऊ शकता का?” असा सवाल त्यांनी केला. याचबरोबर, लालकृष्ण अडवाणींचा दाखला देत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही भाजपला घेरले. “लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंटमध्ये शिकले. दक्षिण भारतात बघा, त्यांना कोण विचारत नाही. उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. काय अडचण आहे?” असे विचारत त्यांनी भाषेवरून वैयक्तिक निष्ठा ठरवण्याच्या वृत्तीवर टीका केली.
हेही वाचा…ठाकरे बंधू अठरा वर्षांनी एकत्र: मराठी विजय मेळावा ठरणार ‘सुवर्ण क्षण’
“देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला एकत्र आणले”
राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरही राज ठाकरेंनी टिप्पणी केली. “कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही… आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचं… ते देवेंद्र फडणवीसांना जमलं,” असे उपहासाने बोलून त्यांनी भाजपच्या धोरणांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
हेही वाचा…‘जय महाराष्ट्र’ मेळाव्यात भरत जाधव यांची सुशील केडियांच्या ट्विटवर प्रतिक्रिया: “मराठी माणसाने जागे व्हायला हवं!”
“मराठी हाच अजेंडा, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहू नका”
मेळाव्यातील प्रचंड गर्दी आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या क्षणांवर राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली. “आता सर्वच चॅनलचे कॅमेरे इकडे लागले तिकडे लागले. आता संध्याकाळी सगळं सुरू होईल. काय वाटतं काय,.. दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती. कोणी कमी हसलं का. बोलतायत का. आपल्याकडे इतर विषय सोडून इतर गोष्टीत रस असतो अनेकांना,” असे ते म्हणाले. या मेळाव्याचा मुख्य उद्देश स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, “आजचा हा मेळावा. मोर्चालाही तीच घोषणा होती. आताही तीच आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कुणी,” असे ठामपणे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि मराठीच्या मुद्द्यावर ठाम राहण्याचे आवाहन केले. या भाषणातून राज ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्व आणि मराठी भाषेवरील भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत, महाराष्ट्राच्या राजकारणात मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
ठाकरे बंधू एकत्र: वरळीत ऐतिहासिक मेळावा, उद्धव ठाकरेंकडून सरकारवर जोरदार हल्ला!
दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापले: राणे-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राऊतांकडून माफीची मागणी!
मुंबईत ‘ठाकरे’ एकजुटीचा विजयी मेळावा: राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल, ‘बूट चाटण्या’चा टोला!
पुण्यात अमित शाहंकडून बाजीराव पेशव्यांना मानवंदना: “एकही युद्ध न हरलेला एकमेव सेनापती!”