उद्या राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. हे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार असून चाळीस किलो वजनाची चांदीची विट कोनशिला म्हणून स्थापित करण्यात येणार आहे. दरम्यान, राम मंदिराच्या पायाभरणी सोहळ्यासाठीच्या धार्मिक अनुष्ठानास सोमवारपासून सुरुवात झाली आहे.
दरम्यान, या सोहळ्याला काही तास उरले असताना सरकारकडून राम मंदिराच्या प्रस्तावित वास्तूची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात सजले आहे. परिसर सुशोभित करण्यात आला असून संपूर्ण अयोध्या नगरी विद्युत दिव्यांच्या रोषणाईने झळाळून उठली आहे. जागोजागी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमा असलेले फलक लावण्यात आले आहेत. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.