रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते औरंगाबाद शहरात शुक्रवारी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झालं. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा पुतळा उभा करण्यात आला आहे. हरिभाऊ बागडे यांच्यानंतर रावसाहेब दानवे भर पावसातच भाषणाला उभे राहिले. पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते, असा टोला रावसाहेब दानवेंनी शरद पवारांना लगावला. आता, मी देखील पावसात भाषण केलं, पुढच्या वेळेस हमखास यश मिळणार असाही विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे.
तसेच, राज्य सरकारवर टीका करताना, महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचे स्टेअरिंग दोन जणांच्या हातात आहे. तर, तिसरा पार्टनर मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत, असं सांगतोय. या गाडीचं स्टेअरींग दोघांच्या हातात असल्याने गाडी झाडावर आदळणार, असा भाकितही दानवेंनी केलं. त्यासोबतच उद्धव ठाकरे हे सर्वच पातळीवर नापास झाले आहेत, त्यामुळे हे नापासांचं सरकार आहे, असा टोलाही दानवेंनी लगावला. तर, राम मंदिरावरुनही उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण आले नाही तरी, रामभक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का? हवे तर सरकारमधील सहकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांनी अयोध्येला जावं. प्रभू रामासाठी मानपान कसला. पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे आता पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत