कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महत्त्वाची असणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक रविवारी पाड पडली. या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. संघासाठी ९९ टक्के पेक्षा अधिक मतदान झाले होते. या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
शाहू शेतकरी आघाडीचे नेतृत्व पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री मुश्रीफ व खासदार प्रा. संजय मंडलिक करत आहेत. दुसऱ्या गटाचे नेतृत्व आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक व अरुण नरके हे करत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निकालानंतर जल्लोष करण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. मतमोजणी केंद्रावर फक्त उमेदवार आणि मतमोजणी प्रतिनिधीनाच परवानगी असून मतदान मतमोजणी केंद्राबाहेरही कोणालाही येण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. संघाद्वारे लाखो लिटर दूधाचा पुरवठा दररोज केला जातो.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 70 मतदान केंद्रांवर ही दूध संघासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर एकावेळी जवळपास 50 ते 55 मतदार मतदान करू शकतील असे नियोजन करण्यात आले होते. करवीर तालुक्यातील मतदान कोल्हापुरातील महाविद्यालयात प्रवेशद्वारावर एकाच वेळी सगळे ठरावधारक आले, त्यामुळे मतदान केंद्रावर तुफान गर्दी झाली. संपूर्ण जिल्ह्यात एकूण 3,650 मतदार होते.