मुंबई : अभिनेता रितेश देशमुख कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाच्या अवयवदानाविषयीच्या विशेष कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी रितेश आपले वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणींविषयी भावूक झाला. वडिलांसाठी मला अवयवदान करता आले नाही, याची खंत देखील त्याने यावेळी बोलून दाखवली. रितेशसोबत कार्यक्रमात अवयवदान चळवळीला प्रोत्साहन देणाऱ्या मोहन फाऊंडेशनचे डॉ. सुनील श्रॉफही सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान रितेश म्हणाला की, वडील विलासराव देशमुख यांच्या शस्त्रक्रियेसाठी लिव्हर सहज उपलब्ध होईल असे वाटले होते, मात्र तसे झाले नाही. शेवटी मी वडिलांसाठी अवयवदानाचा निर्णय घेतला होता. मात्र वैद्यकीय अडचणींमुळे ते शक्य झालं नाही, असे सांगताना रितेशला अश्रू अनावर झाले.
जास्त रुग्णांना अवयवांची गरज असते त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन अवयवदान केलं पाहिजे, असे आवाहन देखील यावेळी रितेशने केले.