सारथीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजित बैठकीत खासदार संभाजीराजेंना स्वतः फोन करुन बोलावलं होतं. मात्र या बैठकीत गोंधळ झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या समन्वयकांनी आक्षेप नोंदवला. मात्र नंतर संभाजीराजेंनी संयमाची भूमिका घेतल्याने हा वाद मिटला
या बैठकीनंतर अजित पवारांनी या सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तसंच “सारथी संस्था बंद होणार नाही. कुणीही अफवा पसरवू नका. मराठा समाजात गैरसमज पसरवू नका, सारथीचं काम पारदर्शी व्हावं” असं अजित पवार म्हणाले.
मराठा समाज समन्वयकांसोबतच्या बैठकीत वाद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या दालनात बोलावून बैठक घेतली. यावेळी अजित पवार यांनी संभाजीराजे यांना आपल्यासोबत समोर मंचावर बसवले. या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, सचिन सावंत हे देखील उपस्थित होते.