नेपाळ आणि हिंदुस्थानचे धार्मिक व सांस्कृतिक संबंध आहेत. ओली यांचे नातेसंबंध चिनी ड्रगन व बाबराशी जुळल्यामुळे त्यांना याचा विसर पडलेला दिसतोय. अयोध्येच्या तीरावर शरयू नदी वाहत आहे असे पुराणात वर्णन आहे. नेपाळात कोठेही शरयू नदी वाहत नाही. तीच शरयू नदी राममंदिराच्या लढ्यात कारसेवकांच्या रक्ताने लाल झाली, पण चिनी लाल माकडांचे गुलाम झालेल्या ओली महाशयांना त्याचे काय? असे म्हणत ओली यांनी प्रभू श्रीरामाच्या नेपाळी होण्याचे जे अकलेचे तारे तोडले आहे अशी टीका सामना अग्रलेखातून नेपाळच्या पंतप्रधानांवर करण्यात आली आहे.
उद्या बाबरही नेपाळीच असल्याची टोपी घालतील. अशा शब्दांत शिवसेनेने सामनाच्या आजच्या अग्रलेखातून नेपाळचे पंतप्रधान ओली यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच, प्रभू श्रीराम हे संपूर्ण जगाचेच होते, पण रामजन्मभूमी अयोध्या मात्र हिंदुस्थानचीच. त्याविषयी वाद असण्याचे कारण नाही. असेही शिवसेनेने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून श्रीमान ओली हे हिंदुस्थानविरुद्ध गरळ ओकीत आहेत व त्यांचे बोलवते धनी चीनमधील लाल माकडे आहेत. त्यामुळेच त्यांच्या माकडचेष्टा वाढल्या आहेत. हिंदुस्थानविरोधी भूमिकेमुळे ओली यांच्याविरुद्ध पक्षात व संसदेत बंड झाले. त्यांची खुर्ची धोक्यात आली तेव्हा नेपाळमधील चिनी राजदूत ओली यांची खुर्ची वाचवण्यासाठी धावाधाव करताना दिसत होते. म्हणजे ओली हे चीनचे गुलाम बनले असून संपूर्ण नेपाळ व तेथील हिंदू संस्कृती चीनच्या दावणीला बांधण्याचे त्यांनी ठरवले आहे. आज प्रभू श्रीराम नेपाळात असते तर जसे रावणास ठार केले व पाप नष्ट केले तसेच त्यांनी हिंदूद्रोही ओलींच्या बाबतीत केले असते. अशी टीका शिवसेनेच्या सामना या मुख्यपत्रातून केसात आली आहे.