कोरोना संकटात विरोधी पक्षाचे नेते सर्वसामान्यांना मदत करण्याऐवजी हेल्थ टूरिज्म किंवा डिझॅस्टर टूरिज्म म्हणून फिरत आहेत. मात्र, आम्ही तसं करत नाही. आम्ही लोकांची मदत कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करत आहोत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केली होती या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी “नया है वह! अशा शब्दात उत्तर दिले होते.
“नया है वह! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवत आहेत. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतंच, असं नाही. त्यामुळे ठिक आहे. ते नवीन आहेत, बोलत आहेत. मला असं वाटतं, माझ्यासारख्या माणसानं त्यावर फार काही प्रतिक्रियादेखील देऊ नये”, अशी टीप्पणी फडणवीसांनी केली होती. फडणवीसांच्या या उत्तरला सामनाचे संपादक संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे
नरेंद्र मोदी-अमित शाह हे दिल्लीत, तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात नवेच आहेत, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्ष नेते फडणवीसांना उत्तर दिले.
“देवेंद्र फडणवीसही नवेच आहेत, ते जुने कुठे झाले आहेत. तरुणांना संधी द्यावी, या मताचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही आहेत. अमित शाहसुद्धा दिल्लीच्या राजकारणात नवीनच आहेत. मात्र त्यांनी गृहमंत्री म्हणून दिल्लीत उत्तम काम केले आहे. मोदीही दिल्लीत नवे होते, त्यांनी उत्तम काम केले, आम्ही कौतुक करतोच की. त्यांना आम्ही नया है वह म्हटलं का? आदित्य ठाकरे हे मंत्री म्हणून चांगले काम करत आहेत” अशा शब्दात राऊतांनी पलटवार केला.