शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. आता लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत पाहण्यास मिळणार आहे. या मुलाखतीचा प्रोमा सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे प्रामुख्याने कोरोना संकट आणि मागील 6 महिन्याचा कालावधी याविषयी भाष्य करताना दिसत आहेत. लॉकडाउन आहेच, एक एक गोष्ट आपण सोडवत चाललो आहे, मी काही ट्रम्प नाही, जी आपली माणसं तडफडताना पाहू शकेल’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.
टीकेची परवा न करता जे योग्य वाटते, ते निर्णय घेणारच, असेही कोरोना, लॉकडाऊन आणि अंतिम वर्षाच्या परीक्षेविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.
दोन भागांमध्ये ही मुलाखत असून, 25 आणि 26 जुलै रोजी ही मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच मुलाखत आहे.