राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असं टायटल द्यायला हवं होतं, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता त्यावर संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.
“देवेंद्र फडणवीस हे राजकारणात नव्हते, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांवर ‘एक शरद बाकी गारद’ अशा शीर्षकाचा अग्रलेख लिहिला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करावा, बेस पक्का करावा, त्यानंतर बोलावं”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस राजकारणात नव्हते, त्याआधी शरद पवार यांच्या राजकीय झंझावातावर बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये अग्रलेख लिहिला होता, त्याचं हे टायटल आहे. एक शरद बाकी गारद, हे बाळासाहेबांनी म्हटलं होतं त्या काळात. खरंतर बाळासाहेबांनी त्यावेळी दोन शरदांविषयी लिहिलं होतं, दुसरे शरद म्हणजे शरद जोशी. त्यामुळे त्यांनी ‘दोन शरद सगळे गारद’ असं म्हटलं होतं. आता एक शरद नाहीत, त्यामुळे राहिले एकच शरद. त्यामुळे त्यांना अभ्यासात थोडा बेस पक्का करावा लागेल. हे बाळासाहेबांचं वाक्य आहे, पवारांविषयी म्हटलेलं. तेव्हा ते राजकारणात नव्हते. आम्ही बाळासाहेबांसोबत काम करत होतो.”