मुंबई : दिल्लीत कोरोना काळात नवे संसद भवन, पंतप्रधानांसाठी पंधरा एकरात नवे घर, नवे उपराष्ट्रपती निवास उभे राहत आहे. ही नवी घरे कोरोना विषाणुप्रूफ आहेत काय त्याबाबत केंद्र सरकारने खुलासा करायला हवा. सध्या आपले पंतप्रधान 7, लोककल्याणकारी मार्ग या 13 एकरच्या विस्तीर्ण निवासात राहत आहेत. नव्या योजनेनुसार ते 15 एकरांच्या घरात जातील. पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, पण हा सर्व उपद्व्याप फकिरीत बसत नाही, अशी जोरदार टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक या सदरातून संजय राऊत दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टवर भाष्य करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
कोरोना काळात ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी गुपचूप तिसरे लग्न उरकून टाकले. जॉन्सन यांनी वेळेचा सदुपयोग केला. दिल्लीत पंतप्रधानांसाठी नव्या घराची उभारणी सुरू आहे. मेहुल चोक्सीपासून प. बंगालातील नव्या राजकीय खेळांत फक्त वेळच घालवायचा उद्योग सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, जॉन्सन यांनी लग्न केले. आमच्या राज्यकर्त्यांनी घर बांधले. लोकांना काय मिळाले? कोरोनामुळे देशातील 97 टक्के जनता गरिबीच्या उंबरठय़ावर आहे. एप्रिल 2020 मध्ये 13 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. सुरक्षित समजल्या जाणाऱया नोकऱयाही लोकांनी गमावल्या आहेत. सर्व काही बंद आहे. फक्त स्मशाने आणि कब्रस्ताने तेवढी चोवीस तास उघडी आहेत. इंग्लंड आणि हिंदुस्थानची परिस्थिती वेगळी नाही.
संजय राऊत यांनी मेहुल चोक्सी प्रकरणावर देखील भाष्य केले. मेहुल चोक्सी हा हिंदुस्थानी भगोडा ऑण्टिग्वाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. चोक्सीपासून आपल्या सत्तेला खतरा आहे म्हणून त्याला हिंदुस्थानात पाठवा, हा ब्राऊन यांचा आग्रह आहे. श्रीमान ब्राऊन यांनी चोक्सीला हिंदुस्थानच्या हवाली केलेच तर नव्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात ब्राऊन यांचा पुतळा नक्कीच उभारला जाईल. 2022 च्या प्रजासत्ताक दिनाचे ते सन्माननीय पाहुणेही असतील, काय सांगावे! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी मिस्टर ब्राऊन यांना ‘भारतरत्न’ही दिले जाईल, असे ते म्हणाले.
Read Also :
- ‘अनलॉक’च्या निर्णयाबाबत गोंधळ का झाला?, मुख्ममंत्री म्हणाले…
- माध्यमांमध्ये जेवढी छाननी आमच्या सरकारची व्हायची, तेवढी आता होत नाही!
- ‘राऊतांच्या धमक्यांना घाबरलो, मला आता पोलीस संरक्षण द्यावे लागेल’
- पुणे उद्यापासून ‘अनलॉक’, जाणून घ्या काय सुरु, काय बंद?
- ‘मराठा समाजच अशोक चव्हाणांचा राजीनामा मागेल, भाजप मागणार नाही’