कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचे भवितव्य ठरविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. सत्तारुढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी यांच्यामध्ये थेट लढत झाली होती. या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे.
गोकुळ दूध संघ निवडणुकीतील विजयानंतर सतेज पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दूधदरात दोन रुपया दरवाढ देणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
दूध उत्पादकांच्या मालकीचा हा दूध संघ आता झालाय. दूध उत्पादकांनी चांगलं यश मिळवून दिलंय. मनापासून डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया विजयानंतर सतेज पाटील यांनी दिली.
सतेज पाटील म्हणाले की, मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार असून, आमच्या शब्दात कोठेही मागे पडणार नाही. शेतकऱ्यांना आम्ही 2 रुपये दर वाढवून देणार आहोत. हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोणाच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत 21 पैकी सतेज पाटील यांच्या आघाडीला 17 जागांवर विजय मिळालाय. सत्ताधारी महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.