आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. यावर भुजबळ यांनी खोचक टिप्पणी केली.
राज्यातील भाजपचे आमदार फुटू नयेत यासाठीच देवेंद्र फडणवीस आणि अन्य वरिष्ठ नेत्यांकडून सत्ता परत येण्याचे लॉलीपॉप दाखवले जात असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते.
त्यांनी म्हटले की, राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. या काळात भाजपच्या आमदारांनी इकडे-तिकडे बघू नये म्हणून वरिष्ठांकडून त्यांना सत्ता परत येणार, असे लॉलीपॉप दाखवले जात असल्याचे भुजबळ यांनी म्हटले.
दरम्यान, आज भुजबळ यांनी नाशिकच्या लॉकडाऊनसंदर्भातही भाष्य केले. येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते आल्यानंतर नाशिकच्या लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले.