औरंगाबादमधील आमदार आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात अब्दुल सत्तार यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर सत्तार यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती
सौम्य लक्षणे असल्याने अब्दुल सत्तार यांच्यावर घरीच उपचार होणार आहेत. करोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करताना चुकून प्रादुर्भाव झाला असेल, असे ट्विट अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
अब्दुल सत्तार 2019 मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर आमदारपदी निवडून आले आहेत. औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. ठाकरे सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांच्याकडे महसूल, ग्रामविकास आणि बंदरे विकास मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेचा झेंडा हाती धरला. 2014 पर्यंत आघाडी सरकारच्या काळातही ते मंत्री होते. सत्तार हे 2009 पासून सलग तिसऱ्यांदा औरंगाबादमधून आमदारपदी निवडून आले आहेत. सध्या त्यांच्याकडे धुळ्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीही आहे.