दूध दरवाढीवरून सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. या सरकारला जनतेशी आणि शेतकऱ्यांशी काहीही घेणेदेणे नाही. ‘एका नवरा आणि दोन बायका’ अशी या सरकारची अवस्था आहे. या तिघाडीचा खेळ आता आवरत आला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही, अशी टीका दूध दरवाढी संदर्भात आंदोलन करताना भाजप नेते राम शिंदे यांनी सरकारवर केली होती.
आता या टीकेला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्या नव-यामध्ये दोन बायका संभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो. आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असे उत्तर सदाशिव लोखंडे यांनी दिले आहे.
हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. घरातला कर्ता माणूस कोपर्यात बसला आहे, प्रजा आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होतं. मात्र या सरकारने अनुदान दिले नाही, असे राम शिंदे म्हणाले होते.
या टीकेला उत्तर देताना, ‘ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो, असे आमचे नेते आहेत. दूध उत्पादक व्याकूळ झाले आहेत ही खरी गोष्ट आहे. दुग्धजन्य पदार्थांना मार्केट मिळत नाही. त्यामुळं केंद्र सरकारनं व राज्य सरकारनंही निर्यातीला प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले पाहिजे, अशी खासदार म्हणून माझीही भूमिका आहे’, लोखंडे म्हणाले.