धुळे जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. अशी घटना जसं कि एखादा चित्रपटातील दृश्यच नाशिक येथील एक पुरुष आणि दोन महिलांनी रेशन दुकानदारांकडून दोन लाखांची खंडणी मागितल्याचे उघड झाले. आणि ते पण चक्क अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने आल्याचे सांगितले.
धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील शिंगावे गावात विजय नारायण सोनवणे यांचे रेशनचे दुकान आहे. सोमवारी 13 जुलैला सोनवणेंच्या दुकानांसमोर काळ्या रंगाची स्विफ्ट कार उभी राहिली. या कारमधून दोन महिला आणि एक पुरुष असे तीन जण उतरले. त्यांच्यासोबत शिंगावे येथील स्थानिक रहिवासी होता. त्यांनी विजय सोनवणे यांच्याकडे जाऊन आम्ही छगन भुजबळ यांच्या आदेशाने तुमच्या रेशन दुकानात तपासणीसाठी आल्याचे सांगितले.
त्यांनी संपूर्ण दुकानातील कागपत्रे आणि दुकानाची तपासणी केली. त्यानंतर रेशन दुकानदार सोनवणे यांना दम देऊन तुमच्या रेशन दुकानात मोठी अफरातफर झाल्याचे सांगितले. तुम्ही गरजू लोकांना धान्य वाटत नाहीत. जर हे प्रकरण मिटवायचे असणार तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
मात्र सोनवणे यांना त्यांच्यावर संशय आला. त्यांनी शिरपूर तहसीलदारांना याबाबतची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी असे कुठलेही पथक आलेले नसल्याचे सांगितले.