पिंपरी चिंचवड : गेल्या एक वर्षापासून या कोरोनाने संपूर्ण जगावर ताबा मिळवला कि काय?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच कोरोनाने कुणाच्या घरातील आधार हिरावला तर कुणाचा रोजगार. कोरोनाचे हे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होऊ लागले आहे. महाराष्ट्रात तर दिवसेंदिवस वाढणारे कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता परिस्थिती कधी स्थिरावेल?, असा प्रश्न तुम्हा-आम्हा सर्वांनाच पडला आहे. मात्र कोरोनाचा सर्वाधिक फटका बसतोय तो ज्यांनी अनेक वर्षे महाराष्ट्राची लोककलेची संस्कृती जतन केली अशा लोककलावंतांना. मग लावणी कलाकार असो किंवा तळ कोकणातील दशावतार. या प्रत्येक कलाकारासमोर आता जगायचे तरी कसे?, हा प्रश्न निर्माण झाला आहे. लोककलावंतांची किमान रोजी रोटी चालू राहावी यासाठी पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे आता पुढे सरसावले आहेत.
लोककला कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही अडचणीत सापडली आहे. सलग दोन वर्षे कोरोनामुळे नाट्यप्रयोग रद्द झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या वर्षीचा संपूर्ण सिझन कोरोना मुळे वाया गेला. चालक मालकांना नव्हे तर संपूर्ण कलाकारांवर महाभयंकर संकट आलं आणि त्या संकटाला कसेबसे तोंड देण्याचे कार्य केले जात आहे. पण आता एवढ्या हलाखीच्या परिस्थितीत आहोत की आता जगावं कसं?, असा यक्ष प्रश्न कलाकांरासमोर पडला आहे. खरेतर हे कोरोना काळात ओढवलेल्या संकटाचे शब्दात वर्णन करणे देखिल कठीण झाले आहे. त्यामुळे सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. कलाकारांच्या रोजी-रोटी चालू राहावी, यासाठी आमदार लांडगे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. कलाकारांना पॅकेज मिळावे. तसेच राज्यातील चित्रपट गृह कोरोना नियमांचे पालन करून सुरू करण्यात यावे, जेणेकरून कलाकारांची आर्थिक घडी कोलमडणार नाही, या मागणीसाठी आमदार लांडगे सरकारकडे तळ लावून धरणार आहेत.
ना घुंगरू वाजला ना फड रंगला
कोरानामुळे गावोगावी भरणाऱ्या जत्रा, उरुस, महोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आल्याने सर्वात जास्त नुकसान तमाशाचे झाले आहे. ऐन हंगामात तमाशाच्या मिळालेल्या सुपाऱ्या रद्द झाल्याने फडमालक हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्रात तमाशाचे लहान-मोठे दोनशे फड आहेत. त्यातील मोठ्या फडात कलाकार, नर्तक, वादक, गडी-मजूर असा शंभर ते दीडशे लोकांना रोजगार मिळत असतो. त्यावरच त्यांच्या कुटुंबाची गुजराण होत असते. तमाशात कोल्हाटी, गोपाळ, डोंबारी अशा जमातींमधील लोकांची संख्या जास्त आहे. आता तमाशाचे खेळच बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातील अनेकांनी फडमालकांकडून उचल घेतली आहे, पण आता उचल कशी फेडायची? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हौशी कलावंत आपल्या कलेपासून दूर गेले आहेत.
घरी नाही राशन सरकारचे फक्त आश्वासन
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची पहिल्या कोरोना लाटेनंतर भेट घेतली होती. अमित देशमुख यांनी समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील?, असे आश्वासन दिले होते. सध्याच्या कोरोना परिस्थितीत उत्सव, यात्रा पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे तमाशा लोककलावंताना आपले जीवन जगणे अवघड जात आहे. त्यांना शासनाने एखाद्या महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून घ्यावे, राज्य शासनाने पूर्वीचे तमाशा अनुदान चालू करावे?, अशा विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने मंत्री अमित देशमुख यांना दिले होते. मात्र ठाकरे सरकार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी कोणतीही हालचाल केल्याचे दिसून आले नाही. केवळ आश्वासनाच्या आशेवर कलावंताना वेठीस धरले आहे.
कलाकार टोकाची भूमिका घेणार?
हातावर पोट असलेल्यांना, रिक्षावाल्यांना अशांना सरकारने पॅकेज जाहीर केलं. मात्र, आमच्यासारख्या लोककलेला सरकार दुर्लक्षित का करत हाच प्रश्न उभा राहतो. आम्ही निवडणुकीच्या वेळी लोकप्रतिनिधींना निवडूण दिले. ते एवढ्यासाठी की लोकप्रतिनिधी आमच्या हिताचा निर्णन घेतील. आम्हाला न्याय मिळवून देतील. नुसती आम्हाला लोकाश्रय मिळून काही होणार नाही, आम्हाला राजाश्रयाची नित्तांत गरज आहे. सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं अन्यथा आम्ही कलाकार टोकाची भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी ठोस भुमिका घेतल्याची परिस्थिती लोककलावंतामधून उमटतांना दिसून येत आहे.
आमदार महेश लांडगेंची भूमिका काय?
पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांनी ठोस भुमिका घेतली आहे. शासनातर्फे अनेक घटकातील लोकांना मदत मिळत असताना, कलाकारांना सुद्धा मदत केलीच पाहिजे. तशी मागणी कोणी करत नसेल तर, मी स्वतः कलाकारांच्या समस्यांची मागणी करेन. जोपर्यंत कलाकारांच्या समस्या सोडवल्या जाणार नाहीत, तोपर्यंत शासनदरबारी लढा करण्यास सर्व चित्रपटाशी संबंधित संघटनांच्या खांद्याला खांदा लावून शासन दरबारी मागणी लावून धरु. काही ठराविक चित्रपटातील लोकांची बैठक घेऊन, या सर्व समस्या लिहून माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देऊ. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार. त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांकडून जोपर्यंत लोककलावंतना न्याय मिळत नाही, तो पर्यंत हा लढा कायम चालू राहिल, अशी भुमिका आमदार लांडगे यांनी घेतली आहे.
दम्यान, एस के आर्ट प्रोडक्शनचे संस्थापक शिवा बागुल आयोजित पहिले ऑनलाइन कलावंत जनआंदोलन काल (दि. १६) रोजी ऑनलाईन माध्यमातून करण्यात आले. यावेळी, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विजय पाटकर, असोसिएशन ऑफ फिल्म अंड व्हिडीओ इडिटर्स संघटनेचे अध्यक्ष यशराज सुर्वे, ज्येष्ठ अभिनेते मिलिंद दस्ताने, संवाद संघटनेचे सुनील महाजन, दिग्दर्शक विजय राणे, सातारा येथील पत्रकार व फिल्म कॅमेरामन दिलीप कुमार डोंगरे, मुंबई फिल्म फेडरेशनचे सेक्रेटरी अशोक दुबे, देवा ग्रूप चित्रपट संघटनेचे अध्यक्ष रोहित गायकवाड, गोंदिया जिल्ह्याचे चित्रपट दिग्दर्शक दिलिप कोसरे, प्रहार चित्रपट संघटनेचे प्रमुख मंगेश सिरसाठ, फिल्म फेडरेशन, मुंबईचे सेक्रेटरी दुबे, मनसे चित्रपट संघटनाचे दत्ताजी घुले, अभिनेते संदीप साखरे, निर्माते बाळासाहेब बांगर, निर्माते बाळासाहेब गोरे, झाडीपट्टी नाट्य अकडमीचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर, मराठी टॅलेंट चित्रपट संघटनाचे अध्यक्ष योगिराज लिपणे, आर्टिस्ट वेल्फेअर असोसिअशनचे अध्यक्ष सचिन देठे, छावा चित्रपट संघटनेचे पुणे अध्यक्ष आकाश घोगरे, चित्रपट आणि नाट्य संस्थेचे चेतन गिरी, दिग्दर्शक चंद्रशेखर सांडवे, ऑल डान्सर असोसिअशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निल कांबळे आदी उपस्थित होते.