मुंबई : आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य सरकार 600 कोटींची मदत करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. सरकारच्या या मदतीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार केले जाणार आहे.
सरकारच्या मदतीमुळे एसटीच्या 98 हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणे शक्य होणार आहे. तसेच या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अनिल परब यांनी आभार मानले आहेत.
गेल्या काही महिन्यात एसटी महामंडळ तोट्यात आहे. कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात एसटी अर्ध्या क्षमतेसह धावत आहे. याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देखील रखडले होते. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एसटीला आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती.
कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर दैनंदिन खर्चासाठी 600 कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे अजित पवार यांनी मान्य केलं आहे. सरकारच्या मदतीमुळे आता अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा दिलासा मिळाला आहे.
Read Also :