कोल्हापूर: कोल्हापुरातील गोकुळ जिल्हा दूध उत्पादक संघ ची निवडणूक नुकतीच झाली. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या जोडगोळीने माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील गटाचा १७-४ असा धुव्वा उडवत गोकुळवर सत्ता स्थापित केली. तब्ब्ल ३० वर्षानंतर सत्तापालट करण्यात विरोधी गटाला यश आले. त्यानंतर काळ गोकुळ दूध उत्पादक संघाच्या नवनिर्चित संचालकांची बैठक झाली. पहिल्याच बैठकीत गोकुळ मध्ये खडाजंगी झाल्याने सर्वांनाच पुढील पाच वर्षांचा अंदाज आला आहे.
गोकुळ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या, कर्मचारी गणवेश ठेक्यात बदल आदी मुद्यांवरून विरोधी गटातील चार संचालकांनी सत्ताधारी गटाला तीव्र विरोध केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी चेअरमन विश्वास पाटील हे होते. गोकुळ मध्ये नियमित कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त आणखी काही कर्मचाऱ्यांचा पुरवठा ठेकेदारामार्फत केला जातो. सध्या ठेकेदाराने गोकुळसाठी तब्ब्ल २३० कर्मचारी पुरवलेले आहेत. गोकुळ मधील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने १८८ कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले गेले होते.
दूध हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थविकासाच्या इंजिनाचे इंधन आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास साडेसहा लाख कुटुंबात गोकूळची समृद्धी नांदते. दुग्धव्यवसायामुळे ग्रामीण जीवनाला सुबत्ता लाभली आहे. #जागतिक_दूध_दिन च्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा! pic.twitter.com/tlC2SWjnas
— Shoumika Mahadik. (@shoumikamahadik) June 1, 2021
या निर्णयावर गोकुळच्या पहिल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. ५९ कामगार आणि अधिकाऱ्यांची बदली, २१ स्वयंसेविका म्हणून काम पाहणाऱ्या महिलांचे काम बंद, गोकुळच्या कर्मचाऱ्यांना गणवेश पुरवण्याची फेरनिविदा, भूदरगड तालुक्यातील कडेगाव येथील बल्क मिल्क युनिट बंद करण्याचा निर्णय आदी विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार भांडण झाले. विरोधी आघाडीचे संचालक शौमिका महाडिक, अंबरीश घाटगे, चेतन नरके, बाळासाहेब खाडे यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.