पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे 250 एकरावर स्वयंपूर्ण असे इलेक्ट्रॉनिक पार्क सुरू केले जाणार आहे. अशा दोन महत्त्वाच्या घोषणा महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केल्या. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) 58 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एमआयडीसीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची (उपदान) मर्यादा दहा लाखांहून 14 लाख करण्यात आली .
देसाई म्हणाले की, राज्याच्या प्रगतीत महामंडळाचा खारीचा वाटा राहिला आहे. जागतिक पातळीवर मान्यता प्राप्त संघटनेत एमआयडीसीचा अभिमानाने उल्लेख केला जातो. त्यामुळे येत्या काळात एमआयडीसीला जागतिक दर्जाचे महामंडळ बनवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. याशिवाय एमआयडीसीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी ग्रॅज्युएटीची मर्यादा दहा लाखांवरून 14 लाख करण्यात येईल. येत्या काळात महामंडळ इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मोठे काम करणार आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे स्वतंत्र, आदर्शवत असे इलेक्ट्रॉनिक पार्क उभे केले जाणार आहे. या निमित्ताने देश-विदेशातील गुंतवणूक राज्यात येईल. याशिवाय रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये आदर्शवत फार्मा पार्क सुरू केले जाईल.
दरम्यान कोरोना संकटात एमआयडीसीने उल्लेखनीय काम केले. गरजुंना अन्नधान्य वाटप केले. औरंगाबादमध्ये कोविड रुग्णालय सुरू केले. मराठवाड्यातील पहिली व्हायरालॉजी लॅब सुरू केली. याचे सर्व श्रेय महामंडळाला जाते, असे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले.