पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी १३ जुलैपासून १० दिवस कडकडीत लॉकडाउनची घोषणा केली आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये औद्योगिक कंपन्या सुरू ठेवण्याची मागणी भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली होती
पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या या मागणीला यश आले आहे. लॉकडाऊनच्या काळात पुणे व पिंपरी चिंचवडमधील उद्योग आणि आयटी कंपन्या अटी-शर्थींसह सुरूच राहणार, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. याबाबतची नियमावली लवकरच जाहीर केली जाणार आहे, असेही जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयांनंतर आपल्या विनंतीला मन देऊन औद्योगिक वसाहतीला परवानगी दिल्याबद्दल आमदार महेश लांडगे यांनी त्यांचे आभार मानले आहेत
कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी ‘लॉकडाउन’ करणे उचित आहे. पण, गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले औद्योगिक क्षेत्राचे अर्थ‘चक्र’ पुन्हा लॉकडाउन करुन बंद ठेवणे चिंताजनक आहे. या संकटामुळे उद्योग आणि कामगार समस्येच्या गर्तेत अडकणार आहेत. त्यामुळे लॉकडाउनमध्ये कंपन्या सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडे भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली होती
दरम्यान, आमदार महेश लांडगे याच्या मागणीनंतर पुणे विभागीय आयुक्तालय प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लॉकडाउनदरम्यान दोन्ही शहरांमधील औद्योगिक कंपन्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.