मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केंद्र सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक वरिष्ठ नेते आणि भाजप नेत्यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदलांची शक्यता आहे.
पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर हा मंत्रिमंडळ विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच, केंद्रात मंत्रीपदासाठी महाराष्ट्रातून देखील काही नावांची चर्चा सुरू आहे. यात प्रामुख्याने खासदार नारायण राणे आणि प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे.
शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या खात्याचा अतिरिक्त भार हा प्रकाश जावडेकर यांना देण्यात आला आहे. त्याजागी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे आहे. मंत्रीपदासाठी नारायण राणेंचे नाव देखील विशेष चर्चेत आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेने आता एकमेकांविरोधात टोकाची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेनेला उत्तर म्हणून नारायण राणेंना मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे.
नारायण राणेंसोबतच महाराष्ट्रातील आणखी एक नाव सध्या केंद्रीय मंत्रीपदासाठी चर्चेत आहे ते म्हणजे खासदार प्रीतम मुंडे. मराठवाड्यात भाजपला बळ देण्यासाठी आणि ओबीसी चेहरा म्हणून देखील मुंडेंना मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुढच्यावर्षी अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप कोणत्या नेत्यांना मंत्रीपद देते हे पाहणे महत्त्वाचे आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ज्योतिरादित्य शिंदे, आसाममध्ये मुख्यमंत्रीपदावरुन दूर केले गेलेले सर्बानंद सोनोवाल यांची नावे देखील चर्चेत आहेत.
Read Also :
- ‘काँग्रेस हाच भाजपाला पर्याय, गावखेड्यात पक्षाचा विचार पोहचवा’; पटोलेंचा कार्यकर्त्यांना आदेश
- ‘महापौरांना काही बोलायची भीती वाटते, त्या आमचा बाप काढतील’
- गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री ठाकरेंचा मोठा निर्णय, केले ‘हे’ आवाहन
- ‘वेळ आली तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जाऊ’
- ‘परदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता’