पुणे – विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूकीचे मतदान आज पार पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पदवीधर निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला.
बारामतीच्या एमईएस हायस्कूलमध्ये जाऊन त्यांनी मतदान केले. सुनेत्रा पवार या पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या आहेत. निवडणूक कुठलीही असो मतदान केले पाहिजे, जे कुणी पदवीधर असतील त्यांनी मतदान केलेच पाहिजेत, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
महाविकास आघाडी सरकारला 100 टक्के मार्क्स देईन. सरकार आल्यानंतर लगेचच कोरोना आला. मात्र, याकाळातही सरकारने जी कामे केली आहेत, ती समाधानकारक आहेत, असे म्हणत सुनेत्रा पवार ठाकरे सरकारचे कौतुक केले. जे पण आमदार म्हणून निवडून येतील त्यांनी पदवीधरांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, पदवीधारांच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
राज्यातील औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या तीन पदवधीर मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. तर पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्यही आज मतपेटीत बंद होईल. 3 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.