महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावली आहे. विरारच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी जाधव यांना बाजू मांडण्यासाठी विरार येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
अविनाश जाधव हे ठाण्यात महापालिकेबाहेर कामावरुन काढण्यात आलेल्या नर्सेससाठी आंदोलन करत असतानाच ही नोटीस बजावण्यात आली. वालीव येथील कोव्हिड रुग्णालयात रुग्णांचे हाल होत असल्याने वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांच्या दालनाबाहेर काही दिवसांपूर्वी जाधव यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत राडा केला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
ठाण्यात एवढे गुंड आहेत ते हद्दपार होत नाहीत. मी लोकांसाठी सातत्याने भांडत असतानाही मला तडीपारीची नोटीस पाठवली. लोकांसाठी कोणी भांडायचं नाही का?, असे अविनाश जाधव म्हणाले.