मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्यामध्ये पाय ठेऊ देणार नाही. अशी भूमिका उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी घेतली. त्यानंतर माझ्याविरोधात अयोध्या दौऱ्याबाबत सापळा रचल्याचं सांगून राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला. तसेच याला खतपाणी हे महाराष्ट्रातूनच मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत धक्कादायक माहिती सांगत माझ्याविरोधात सापळा रचला असल्याचं सांगत राज्यातील काही नेत्यांवर टिका केली. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलचं तापलेलं दिसून आलं. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अलिकडेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह बृजभूषण सिंह यांचा एकत्रित असलेला फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे सध्या हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यावरूनच मनसेने राष्ट्रवादीवर कडाडून टिका केली आहे.
संदीप देशपांडे यांनी त्यात म्हटलं आहे की, तेल लावलेले पैलावान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबानं विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे. अशा प्रकारचा आशाय संदीप देशपांडे यांनी ट्विट केला आहे. तो फोटो महाराष्ट्रातील एका कुस्ती आखाड्यातील दिसत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसनेच सापळा रचला असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, याप्रकरणाबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आम्ही सुद्धा अनेकदा खासदरांना भेटलो आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. समजा उद्या मी योगी आदित्यनाथ यांना भेटलो तर त्यांना मी रसद पुरवली असं ते म्हणतील.