भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीतील निवडणुकांच्या वक्तव्यवरुन पाटील यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले असते, तर त्यांच्या राज्यात राष्ट्रवादीला 20 आणि काँग्रेसला 10 जागाच आल्या असत्या, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असं म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदार कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशासनाला हे सरकार 5 वर्षे टिकणार आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. संजय राऊत सरकार पाडून दाखवा असं म्हणत आहेत, पण सरकार पाडण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. तुम्ही वेगळे लढला असता तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या. तुम्ही एकत्र लढूनही तुमच्या एकूण 98 जागा निवडून आल्या आणि आमच्या एकट्याच्या 105 निवडून आल्या आहेत.”
“पुढील निवडणुकीत चारही प्रमुख पक्षांनी वेगवेगळं लढायचं असं ठरवू आणि लढून बघू. या येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र लढल्यावर चारही पक्षांपैकी कुणाला किती बेस किती आहे हे बघू,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.