कराड: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता निवडणूक होणार आणि यावेळी देखील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात परिवर्तनाची लाट येणार की पुन्हा एकदा सहकार पॅनलचा कारखान्यावर दबदबा राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
कृष्णाकाठी बोरगाव आणि रेठरे हरणाक्षमध्ये होणाऱ्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. दोन्ही मोहितेंचे मनोमिलन अद्यापही झालेले नाही आणि तरीदेखील दोन्ही बाजुंनी प्रचार जोरात सुरु असल्याचे चित्र आहे. अविनाश मोहिते यांनी पायाला भिंगरी लावत सभासदांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत. बोरगावात रयत पॅनलचे इच्छुक विलास शिंदे यांचा अर्ज अवैध ठरल्याने तिथे रयत पॅनलचा पत्ता कट झाला आहे. सहकार पॅनलकडून जितेंद्र पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे आणि संस्थापक पॅनलकडून दोन मात्तबर इच्छुक आहेत. उदयसिंह शिंदे आणि मानाजी पाटील यांच्यात उमेदवारी कोणाला द्यायची याचा चेंडू अविनाश मोहिते यांनी गावातील प्रमुखांवर सोडलेला आहे.
रेठरे हरणाक्षमध्ये सगळ्याच पॅनलमध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. इच्छुकांनी पॅनल प्रमुखांना अक्षरशः डोके धरण्यास भाग पडले आहे. तरीदेखील सहकार पॅनल मधून जे. डी. मोरे, संस्थापक पॅनल मधून केदार शिंदे, रयत पॅनल मधून विश्वास उर्फ दिलीप मोरे यांनी मनाचे तारे तोडत आपलीच उमेदवारी फायनल आहे असे म्हणत सभासदांच्यागाठी भेटी घेण्यास सुरुवात केलेली आहे. उमेदवारीचे कोणाला मिळणार हे जरी १७ जूनला स्प्ष्ट होणार असले तरी देखील या दोन गावातील इच्छुकांनी उमेदवारी फायनलच आहे असे समजून प्रचार करण्यास जोर दिला आहे. रेठरे हरणाक्षमध्ये कोणालाही उमेदवारी मिळाली तरी देखील तीनही पॅनलला बंडखोरीचा फटका बसणार हे निश्चित आहे.