महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध विषयांवर दोघांची जवळपास दीड तास चर्चा चालली. “ही राजकीय भेट नसून महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात रस नाही” असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.
“ही कुठलीही राजकीय भेट नाही, आम्हाला सरकार पाडणे वगैरेमध्ये रस नाही, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, यासाठी ही भेट झाली. अंतर्विरोधाचं हे सरकार चालेल तोपर्यंत चालेल, पडेल तेव्हा बघू काय करायचं” असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
“भाजपची नवी कार्यकारिणी अद्याप तयार झालेली नाही, त्यानंतर संसदीय समिती होईल, त्यामध्ये नियुक्त करण्याचा अधिकार पंतप्रधान, पक्षप्रमुखांचा आहे, माझी नियुक्ती झालेली नाही. देशात काय चालतं, राज्यात काय चालतं हे मला माहिती नाही, मी महाराष्ट्रातील नेता आहे” असंही ते म्हणाले.
“जाहिरातींवर कुणाचेही फोटो छापा, मारामाऱ्या करा, पण लोकांना फायदा झाला पाहिजे असे निर्णय घ्या” असा टोला ‘महाजॉब्स’ पोर्टलवरुन शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये उडालेल्या खटक्यांवरुन फडणवीसांनी लगावला.