पुणे : मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून १९९९ मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा शहराध्यक्ष, महापौर, आमदार यांचे वलय स्वत: अनुभवले आहे. या पदाचे महत्त्व काय आहे, या पदाची प्रतिष्ठा काय आहे, हे मी पाहिले आहे. जे वलय मी पाहिले होते, ते वलय आज पक्षाने माझ्याभोवती निर्माण केले आहे. मग ते मला मिळालेले महापौरपद असो वा सध्याची जी जबाबदारी पार पाडत आहे, ते शहराध्यक्षपद असो. हे वलय प्रशांत जगताप या व्यक्तीचे नव्हे, तर या पदांचे आहे. आणि या पदांची प्रतिष्ठा कायम तशीच राहिली पाहिजे. माझ्याबरोबरच प्रत्येकाने ध्येयासाठी अतोनात प्रयत्न केले पाहिजे, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण ध्येयवेडे लोकच इतिहास घडवतात आणि वेडे ठरविणारे लोक ते इतिहास वाचतात, अशी भावना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड होवून जगताप यांना आज ५० दिवस पुर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने ५० दिवसांच्या प्रवासाशह राजकीय कारकिर्दीतल्या आपल्या भावना आणि प्रवास मांडला आहे. जगताप म्हणाले, ७ मे २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे शहराध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली. आज या नियुक्तीला ५० दिवस पूर्ण होत आहेत. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकून पक्षाने नगरसेवक, महापौर केले. त्यानंतर शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. खरं तर शहराध्यक्षपद ही माझ्या दृष्टीने केवळ नियुक्ती नव्हती. पक्षाकडून झालेला माझा बहुमान होता. नियुक्तीनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे, ८ मे रोजी मी तत्कालीन शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्याकडून पदभार स्वीकारला. आणि माझ्या जबाबदारींना सुरुवात केली, असे जगताप यांनी सांगितले.
सत्ताधारी भाजपच्या मनमानीला रोखण्यासाठी आंदोलन
पक्षाची ही जबाबदारी पार पाडत असतानाच माझे कुटुंब असलेल्या पुणेकरांची अडचण दूर करूण्याच्या दृष्टीने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू असलेल्या मनमानीला रोखण्यासाठी पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. मग, तो पेट्रोल दरवाढीचा विषय असो वा पावसाळा सुरू होऊनही पालिकेने खड्ड्यांची कामे पूर्ण न केल्याचा विषय असो. या आंदोलनात मी शहराध्यक्ष म्हणून सहभागी होतो, नेतृत्व करीत होतो. मूलभूत सोयी – सुविधांवरून सत्ताधारी भाजपला धारेवर धरत असतानाच समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आपला पक्ष, आपली मदत, आपला आधार पोचला पाहिजे, अशी भूमिका आम्ही कायम जपली. कोरोना काळात ज्यांच्यावर संकटाची कुऱ्हाड कोसळली, त्यांच्यापर्यंत मदत पोचवली, असे जगताप यांनी सांगितले.
कार्यालयाचा उद्घाटनाच्या गर्दीचा गुन्हा स्वीकारला
१९ जून रोजी अजित पवारांच्या हस्ते पुण्यातील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा झाला. या वेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. कोरोना काळात सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी आणि अजित पवारांची जाहीर सभा यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचला होता. त्यातून झालेल्या गर्दीमुळे कोरोनाबाबतचे काही नियम पाळले गेले नाहीत, हे खरे आहे. शहराध्यक्ष या नात्याने मी या कार्यक्रमाचा आयोजक होतो. त्यामुळे, मी हा गुन्हा स्वीकारला, असे जगताप यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार
२०२२ मध्ये होणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असेल, हा विश्वास आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपणा सर्वांनाच एकमेकांच्या मदतीने काम करायचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहराच्या नव्या कार्यकारिणीत काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी यंदा प्रथमच ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल लवकरच पक्षश्रेष्ठींना सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे, लवकरच पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर होईल. या कार्यकारिणीसह आणि कार्यकर्त्यांसह आपल्याला पक्ष संघटना अधिक मजबूत करायची आहे. पुणेकरांसाठी अहोरात्र कार्य करत पुणेकरांचे मतपरिवर्तन करायचे आहे, असेही जगताप यांनी सांगितले.
Read Also :
- आंबिल ओढा कारवाईनंतर अजित पवारांची पुण्यातील आढावा बैठकीला दांडी
- भाजपच्या नैराश्यापोटी अनिल देशमुखांवर कारवाई, आम्हाला त्याची चिंता नाही – शरद पवार
- केंद्र सरकार आपल्या कर्तव्याला चुकलं, जयंत पाटलांचा ओबीसी आरक्षणावरून भाजपवर आरोप
- भाजपविरोधी आघाडीवर संजय राऊत म्हणतात, “शरद पवारांचं महत्व वाढवण्याची काय गरज…”
- मोठी बातमी! अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात, ४ तासांपासून सुरु आहे चौकशी