“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला होता. तसेच यावर आता भाजपचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरु झाले आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.
संजय राऊत यांच्या या टीकेला छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. “संजय राऊत आमच्याकडे दाखले मागतात आणि आता ते आम्हाला विचारतायेत? संजय राऊतांना काहीही उत्तर देणार नाही” असे उत्तर उदयनराजे यांनी राऊत यांच्या टीकेला दिले.
तसेच बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे? शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो वर आहे, यावर आक्षेप का घेतला नाही?” असा प्रतिप्रश्न उदयनराजे यांनी केला. “बाळासाहेब मोठे वाटत असतील तर शिवसेनेने ठाकरे सेना नाव ठेवावं” असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी अपमान झाल्याबद्दल राजीनामा द्यावा अशीही मागणी केली जात होती त्यावर “मी का राजीनामा देऊ? जे घडलंच नाही, त्याबद्दल कशाला राजीनामा देऊ? मी माझी शपथ नीट घेतली. ज्यांनी आक्षेप घेतला, त्यांनी राजीनामा द्यायला हवा” असे थेट उत्तर उदयनराजे यांनी दिले .