मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज एक दिवसीय पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या सूचना घेत निर्देश दिले.
खासगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर परस्पर तपासणी अहवाल रुग्णांना देऊ नये. तो अहवाल संबंधित महापालिकांना द्यावा, अशीही सूचना त्यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, “तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बऱ्याचदा रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येते. असे होवू नये यासाठी खासगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना परस्पर तपासणी अहवाल न देता संबंधित महापालिका यंत्रणेला द्यावा. जेणेकरुन रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होईल.”