प्रसिद्ध अभिनेते, विनोदवीर जगदीप म्हणजेच सैयद इश्तियाक अहमद यांचं वृद्धापकाळानं बुधवारी मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांची शोले या चित्रपटातील सुरमाँ भोपाली साकारलेली ही भूमिका फार गाजली होती.
जगदीप यांचा जन्म २९ मार्च १९३९ रोजी मध्यप्रदेशातील दतिया या जिल्ह्यात झाला होता. सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे त्यांचं खरं नाव होतं. त्यांनी बी.आर. चोप्रा यांच्या अफसाना या चित्रपटापासून बालकलाकार म्हणून भूमिका साकारण्यास सुरूवात केली. त्यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
शोले चित्रपटातील त्यांची सुरमा भोपालीची भूमिका फार गाजली. या चित्रपटानंतर अनेक जण त्यांना सुरमाँ भोपाली म्हणूनच ओळखू लागले होते. जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. ते दोघं आपल्या नृत्य कौशल्यासाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत.