मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थआनी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून छापेमारी सुरु होती. सकाळी 8 वाजेपासून सुरु असलेली ही छापेमारी तब्बल 9 तास चालली. या छापेमारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास संत्रणांवर जोरदार टीका केलीय. आमच्यासाठी हे नवं नाही, अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांवर, त्यांच्या मुलाच्या व्यवसायावर केंद्राने लक्ष ठेवलं होतं. त्यांच्या हाती काही लागलं नाही. त्या नैराश्यातून हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दात शरद पवारांनी केंद्रावर टीका केली होती. पवारांच्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलंय.
जाणते पवार म्हणतायत @AnilDeshmukhNCP यांच्या तपासातून काहीच हाती लागलेलं नाही, केवळ त्रास देण्यासाठी कारवाई सुरू आहे.
अहो मग, कोलकात्यात कोट्यवधींची उलाढाल असलेली बोगस खाती कुणाच्या मुलांची होती? बारवाल्यांनी दिलेली खंडणी CM फंडासाठी होती का @PawarSpeaks?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 25, 2021
अनिल देशमुख यांच्या तपासातून काहीच हाती लागणार नाही, असं शरद पवार म्हणाले. पवारांच्या या वक्तव्यावरच भातखळकर यांनी निशाणा साधलाय. ‘जाणते पवार म्हणतायत अनिल देशमुख यांच्या तपासातून काहीच हाती लागलेलं नाही, केवळ त्रास देण्यासाठी कारवाई सुरू आहे. अहो मग, कोलकात्यात कोट्यवधींची उलाढाल असलेली बोगस खाती कुणाच्या मुलांची होती? बारवाल्यांनी दिलेली खंडणी CM फंडासाठी होती का?’ असा सवाल अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन विचारला आहे.
देशमुखांच्या चौकशीवर पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या कारवाईवरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. ‘हे काही नवीन नाही. अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. तसंच त्याला महत्व देण्याचीही गरज नाही. यापूर्वीही देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला. पण त्यात काही हाती लागलं नाही. आताही काही लागणार नाही. त्यामुळे त्याबाबत आम्हाला कसलीच चिंता वाटत नाही’, असं शरद पवार म्हणाले.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर त्यांच्यावर मनी लॉन्डरिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याआधी सीबीआयनेही देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील बार आणि हॉटेल चालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करुन आणण्याचे आदेश देशमुख यांनी सचिन वाझेला दिले होते, तसेच पोलिसांच्या बदल्यांमध्येही देशमुख यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप परबमीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल होता.