राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र या सरकारच्या गाडीचं स्टीरींग कोणच्या हातात आहे उद्धव ठाकरे कि अजित पवार यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे. काही दिवसांपूर्वी सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत ‘या तीन चाकी सरकारचे स्टेअरिंग माझ्याच हाती आहे.’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मात्र उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक छायाचित्र शेअर केले. अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा इलेक्ट्रीक कारमधील एक छायाचित्र शेअर केले. यामध्ये कारचे स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात आहे. अजित पवार यांनी ट्विट केलेल्या छायाचित्राची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.
दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक दिवसीय पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई प्रवास केला. उद्धव ठाकरे यांच्या या स्टंटबाजीनंतर पुन्हा एकदा नक्की स्टेअरिंग कोणाच्या हातात अशी चर्चा रंगू लागली होती.
या सर्व प्रकारांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नक्की महविकासआघाडी सरकारच स्टेरिंग कुणाच्या हातात आहे यावर फडणवीस म्हणाले,” स्टेरिंग कुणाच्या हातात हे उद्धवजी आणि अजित पवार ठरवतील” मात्र हे सरकार एक ट्रेन आहे ज्या ट्रेनला तीन इंजिन असून हे तिन्ही इंजिन तीन दिशेला जाताना दिसत आहेत.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.