पुणे : ‘द गॉड फादर’, कारभारी लयभारी, विकासाचे शिल्पकार, पुण्याचे कारभारी, विकासपुरूष, आक्रमक आणि आश्वासन नेतृत्व, नव्या पुण्याचे शिल्पकार वगैरे वगैरे राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांच्या चमकोगिरीची जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे गेले दोन दिवस देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या शहरात लावण्यात आलेल्या या होर्डिंगमुळे राजकीय वर्तुळात अत्यंत खमंग चर्चा रंगल्या आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कोरोनाकाळात कुणीही बॅनरबाजी करू नये, अशा सुचना दिल्या असतानाच पुण्यातील स्थानिक नेत्यांनी चमकोगिरीसाठी आपला नेता किती पावरफुले हे दाखवण्याच्या नादात चक्क पुण्याचे शिल्पकारच घोषीत केले आहेत. त्यामुळे भाजप- राष्ट्रवादीच्या श्रेयवादाच्या लढाईत पुणे शहराचे खरे शिल्पकार कोण?, चमकोगिरीसाठी शहराच्या इतिहासाला हरताळ फासणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर काही कार्यवाही होणार का?,याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले देवेंद्र फडणवीसांना नव्या पुण्याचे शिल्पकार
राज्यातल्या सगळ्यात दोन पावरफूल नेत्यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असतो आणि ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस एकाच दिवशी येणार हा योगायोग आहे. मात्र सध्या राज्याचे शकट हाकण्यात या दोघांची महत्त्वाची भूमिका आहे. सत्ताधारी आणि विरोधक म्हणून त्यांचा संघर्ष जसा सभागृहात सुरू आहे तसाच तो पुण्यातही सुरू आहे आणि तो म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून. येत्या सहा महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या असल्याने आपला नेता किती पावरफूल आहे हे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जणू स्पर्धा लागली आहे. शहरातल्या सगळ्या प्रमुख चौकांमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे भलेमोठे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत.
राष्ट्रवादी – भाजपचे शहरातील योगदान किती?
राष्ट्रवादीचे नेते हे देवेंद्र फडणवीस कधीपासून पुण्याचे विकासाचे शिल्पकार झाले असा प्रश्न विचारत आहेत तर भाजपकडून शहरातले मेट्रो पासून जायका पर्यंतचे सगळे प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून आले असल्याचा दावा करतात. गेले पंधरा ते वीस वर्ष पुण्याच्या राजकारणावर अजित पवार यांची एक हाती पकड होती. मात्र राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पंधरा वर्षांनंतर पुण्याला नवा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या स्वरूपात मिळाला. सहाजिक त्यांच्या कामाचा वेग उरक या सगळ्या गोष्टींची बरोबरी अजित पवार यांच्या कामाचे स्टाईलचे केली गेली आणि उत्तर अपेक्षेप्रमाणे नकारात्मकच येत होतं.
राज्य सरकार भाजपच असताना देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या २४ तास पाणीपुरवठा पासून मेट्रोपर्यंत सगळ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये वैयक्तिक लक्ष घातलेलं होतं मात्र आजवर यातला एकही प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. आता अजित पवार यांनी पुन्हा पुण्याच्या पालकमंत्रिपदाचे सूत्र हातात घेतल्यानंतर वैयक्तिक स्तरावर लक्ष घालून त्यांनी महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही मोठ्या प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुण्याचा कारभारी म्हणून त्यांची ओळख आहे खरी पण आता महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपने देवेंद्र फडणवीस यांना पुण्याच्या विकासाचा शिल्पकार असा ब्रँड तयार करून राजकीय आव्हान दिले.
खरचं फडणवीस नव्या पुण्याचे शिल्पकार आहेत?
पुणे शहर हे आजही विद्येचे माहेरघर म्हणून संबोधले जाते. त्याचबरोबर सांस्कृतिक शहर, ऐतिहासिक परंपरा, दख्खनची राणी, शिक्षणाचे आगार, पूर्वेकडील ऑक्सफर्ड, आणि आता आयटी शहर अशा विशेषणांनी पुणे शहर फार पूर्वीपासून आजपर्यंत प्रसिद्ध आहे. शहराला फार मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले, महर्षी अण्णासाहेब कर्वे, पंडिता रमाबाई, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांसारख्या अनेक राजकारणी आणि समाजकारणी व्यक्तींनी शिक्षणाचा पाया रोवून पुणे शहराला भारतात एक आगळे वेगळे शैक्षणिक स्थान मिळवून दिले.
रणधुमाळी महापालिका निवडणुकांची : पुण्याची काँग्रेसची धूरा पृथ्वीराज चव्हाणांकडे?
त्याचबरोबर गेल्या कित्तेक वर्षापासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांनी पुण्याच्या विकासासाठी मोठी झटापट केली आहे. त्यातच आता बालेवाडीतील लाभलेल्या ऑलंपिकच्या इतिहासचे जगभर नाव गाजत आहे. हे चित्र एकीकडे असताना २०१७ मध्ये एकहाती सत्ता आलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांना नव्या पुण्याचे शिल्पकार बनवून टाकले. अगर फडणवीस शिल्पकार तर मग बाकीच्यांचे काय?, फडणवीसांच्या रुपात नव्याने पाहू इच्छित असणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा शिल्पकार पुणेकर स्विकारणार का?, असे असेल तर राष्ट्रवादीच्या विकास कामांचे शिल्पकार कोण?, असे अनेक प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत.
पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते/कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भाजप आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आल्याचे कळविले आहे. परंतू, भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये महापौर, सत्तारूढ पक्षनेते, आजी-माजी आमदारांसह विरोधीपक्षातील शहराध्यक्षसह इतर नेत्यांनी चमकोगिरीचा प्रपंचच मोडला आहे. त्यामुळे, पदाधिकाऱ्यांच्या चमकोगिरीवर वरिष्ठ नेते कारवाई करणार का?, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
मनसेंनी वाहिली महापालिकेला श्रद्धांजली
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे, सत्ताधाऱ्यांबरोबरच मनसे देखील आक्रमक झाली असून निवडणुकीची जय्यत तयारी देखील सुरु केली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे हे देखील पुणे मुक्कामी तळ ठोकून आहे. मात्र, याचदरम्यान एकीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर नव्या पुण्याचे शिल्पकार असा उल्लेख केला असतानाच मनसेने पुण्यात महापालिकेचा “कैलासवासी पुणे महानगरपालिका” असा उल्लेख करत जोरदार होर्डिंगबाजी करत पालिकेच्या ढिसाळ कारभारावर निशाणा साधला आहे. मनसेने जसासतसे उत्तर दिल्याने सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये विकासकामांवरून शीतयुद्ध रंगू लागले आहे.
Read Also :
- पंकजांना डावलून प्रदेश भाजपची जोरदार बैठक; प्रश्नांची झोड उठताचं प्रवक्त्यांकडून पांघरण घालण्याचा प्रयत्न
- पंकजांना डावलून प्रदेश भाजपची जोरदार बैठक; प्रश्नांची झोड उठताचं प्रवक्त्यांकडून पांघरण घालण्याचा प्रयत्न
- आषाढीदिनी पंतप्रधान मोदींची विठ्ठल चरणी प्रार्थना; म्हणाले वारकरी चळवळ ही…
- राज्यसभेच्या १४ जागा रिक्त, पोटनिवडणूक एकाच जागेवर, राजकीय पक्षांना धक्का
- रणधुमाळी महापालिका निवडणुकांची : पुण्याची काँग्रेसची धूरा पृथ्वीराज चव्हाणांकडे?