राहुल गांधी यांची 2017 मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून निवड झाली. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या निराशाजनक कामगिरीनंतर राहुल गांधींनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी पक्षप्रमुख म्हणून त्यांची जागा घेतली.
मात्र आता राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या 15 ऑगस्टनंतर होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्षपद बहाल केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली होती.
काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गेल्या महिन्यात झाली. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल गांधींकडे देण्याची मागणी केली. मात्र पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत राहुल गांधींनी त्यावेळी मौन बाळगले होते. परंतु आधी ज्योतिरादित्य शिंदे यांचे पक्षांतर आणि आता सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड पाहता राहुल गांधी यांचे मतपरिवर्तन झाल्याचे दिसत आहे.