मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात.
काही दिवसांपुर्वीच शिवसेनेकडून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आता मातोंडकर अधिकृतरित्या पक्ष प्रवेश करू शकतात.
याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी मातोंडकर यांन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. मात्र उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर काही दिवसांनीच त्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाला वैतागून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
आता मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करून आपली राजकारणातील दुसरी इंनिंग सुरू करण्याची शक्यता आहे. 45 वर्षीय उर्मिला मातोंडकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलेले आहे. त्यांचे ‘रंगीला’, ‘प्यार तुने क्या किया’, ‘भूत’, ‘कौन’ यासारखे असंख्य चित्रपट गाजले आहेत.