मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील मेट्रोमधून प्रवास करतानाचे फोटो ट्विट केले आहेत. तसेच त्यांनी या ट्विटरमध्ये ‘मुंबईत मेट्रो-3 मार्गाने मी विमानतळापर्यंत असा कधी प्रवास करु शकेन?,’ असा सवाल करत महाविकास आघाडीला चिमटा काढला होता. फडणवीसांच्या याच ट्विटला उत्तर देताना अजित पवार यांनी वरील वक्तव्य केले.
“राज्यात मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरात मेट्रोचे काम सुरु आहे. हे सर्व काम आम्ही तडीस नेत आहोत. मेट्रोच्या कामासाठी राज्याच्या हिश्शाचा पूर्ण निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विधानसभेचे विरोधी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा प्रश्न आहे,” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात पुणे, मुंबई, नागपूर अशा शहरांमध्ये मेट्रोचे काम सुरु आहे. या कामात कुठं काय अडचण आली?, काम कसं चालू आहे?, ठरल्याप्रमाणे काम होत आहे की नाही,? या सर्व गोष्टींचा आढावा मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असतो. आयोजित केलेल्या बैठकांना सर्व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित असतात. मेट्रोच्या कामासाठी राज्य सरकारकडून निधी कमी पडणार नाही, याची सरकारकडून काळजी घेतली जाते, असे अजित पवार म्हणाले.