नांदेड : मागील काही दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. त्यांच्या टीकेला अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते देखील जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील बावचळले आहेत, असे म्हणत निशाणा साधला आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार नांदेडमध्ये बोलत होते. भाजपाचे नेते तोंडाला येईल ते बोलत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तर बावचळले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
जपामधील कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत, यासाठी सरकार पडेल असे गाजर दाखवण्याचे काम सुरु आहे. तरीदेखील एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यासारखे नेते आमच्याकडे आले, असे अजित पवार म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. माझ्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी असं कधी पाहिलं नव्हतं, असेही ते यावेळी म्हणाले.