पुणे : 1 डिसेंबर रोजी पार पडलेल्या राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदानाची आज मोजणी होत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील लढत ही चुरशीची पाहण्यास मिळत आहे.
सुरुवातीच्या निकालांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड हे 10 हजार मतांनी पुढे असल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर आहेत.
निकाल येण्यास रात्र होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयाचे बॅनर्स झळकल्याचे पाहण्यास मिळत आहे. पुण्यात सारसबाग चौकात पर्वती मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अमोल ननावरे यांनी महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर झळकावले आहेत.
निकाल येण्यास अनेक तास बाकी असताना, विजयाचे बॅनर झळकल्याने जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.