अहमदनगर : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राज्यात थोड्या दिवसात भाजपचे सरकार येणार आहे, असा दावा भाजप नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर कर्डिले यांनी हा दावा केल्याने याची विशेष चर्चा होत आहे.
अहमदनगर येथे बोलताना कर्डिले म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेज जण आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काही दिवसांनी राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे. भाजपची केंद्रात सत्ता आहेच, पण आता राज्यातही सत्ता येईल. राज्यात भाजपची सत्ता येणार असल्यामुळेच ते आमच्या संपर्कात आहेत. याशिवाय आगामी काळात नगरमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बरेच नगरसेवक आमच्यासोबत येतील.
दरम्यान, सांताक्रुझच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये शनिवारी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली होती. ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी काय चर्चा केली याबाबत खुलासा झाला नव्हता. मात्र या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आले.