अहमदनगर – “प्राजक्त, नगरच्या विकासनिधीसाठी ‘मामा’ची मदत घ्या नाही तर माझाच मामा व्हायचा”, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरच्या सभेत खसखस पिकवली. मंत्री जयंत पाटील हे नात्याने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मामा. अजित पवार यांनी आजच्या भाषणात जयंतरावांच्या आणि प्राजक्त तनपुरेंच्या नात्याचा उल्लेख करत उपस्थितांना खळखळून हसायला भाग पाडलं. निधी मिळवताना मामाचीही मदत घ्या नाहीतर आमचाच मामा व्हायचा, अशी मिश्किल टिप्पणी अजितदादांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यानंतर त्यांनी जोरदार भाषण केलं. संपूर्ण नगर जिल्ह्याचा आढावा घेत राष्ट्रवादीच्या आमदारांना जनतेने निवडून दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले.
“मी पहिल्यांदा निवडून आलं होतो तेव्हा मलाही राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली होती. पण माझ्याकडे तीन खात्यांचा कार्यभार होता. आता तुमच्या या पठ्ठ्याला (प्राजक्त तनपुरे) पाच-सहा मंत्रालयांचं राज्यमंत्रिपद मिळालंय. वाढपी तुमचाच आहे, पंगत जेवायला बसलीय, राहुरीला जास्त मिळणार यात शंकाच नाही. पण वाढपी कशामुळे निवडून आला, तर कोपरगाव, संगमनेर, राहुरी, अहमदनगर अशा सगळ्या मतदारसंघांमुळे…”
“प्राजक्ता, इथेही लक्ष दे रे बाबा, माझ्या बारामतीकडे नंतर लक्ष दिलंस तरी चालेल. पण सगळ्यांना वाटलं पाहिजे, राहुरीसारखं आमच्याकडेही लक्ष देतोय”, असं म्हणत अजितदादांनी एकाचवेळी कौतुक, टोले आणि टोमणे लगावले.