शिरुर लोकसभा मतदार संघातील बहुचर्चित खेड विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून भाजपाचे माजी तालुकाप्रमुख अतुल देशमुख यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तीव्र इच्छुक सुधीर मुंगसे आणि बाबाजी काळे यांचा पत्ता कट झाला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
विशेष म्हणजे, खेडमधून शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर सभा-कार्यक्रमांमधून टीकेचा भडीमार करणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहीते-पाटील यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा निर्धार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत खेडमधून भाजपाचे तत्कालीन तालुकाप्रमुख अतूल देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे खेडमधील राजकीय समीकरणे बदलली. दुसरीकडे, गेल्या दोन वर्षांपासून या मतदार संघातून महाविकास आघाडीच्या तिकीटासाठी कंबर कसलेले सुधीर मुंगसे व बाबाजी काळे यांची अडचण झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या वर्चस्वाला आणखी एक धक्का देत, महाविकास आघाडीने जिल्ह्यातील २१ मतदार संघांमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी खेड विधानसभा मतदार संघातून ‘तुतारी’च्या चिन्हावर अतुल देशमुख यांनी निवडणूक लढवण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे मतदार संघात देशमुख यांच्या जनसंपर्काची बारी सुसाट चालली आहे.
दरम्यान, अतुल देशमुख यांना उमेदवारीबाबत निश्चितता दिल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे बाबाजी काळे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुधीर मुंगसे काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीतील कामाची पोहोचपावती…
लोकसभा निवडणुकीत खेड विधानसभा मतदार संघातील अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधात प्रचाराचे रान पेटवले. या मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळेल, अशी आशा होती. मात्र, अतूल देशमुख यांनी ऐनवेळी भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केला. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पक्षप्रवेशामध्ये देशमुख यांनी मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य देवू, असा दावा केला होता. तो दावा खरा करीत देशमुख यांनी मतदार संघ पिंजून काढला आणि अपेक्षेप्रमाणे दिलीप मोहिते-पाटील यांना शह देत डॉ. कोल्हे यांना तब्बल ५० हजारांपेक्षा जास्त मतांची विजयी आघाडी मिळवून दिली. त्यामुळेच महाविकास आघाडीकडून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून समजते आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“मी ९ मंत्री पाडणार, १३ तारखेला सांगतो,” मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
हेही वाचा…अटल सेतूवर पडल्या लांबच लांब भेगा, नाना पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
हेही वाचा..राष्ट्रवादीत नाराज असलेल्या भुजबळांचे शिवसेनेतील दार बंद करा, बैठकीत झाला मोठा निर्णय
हेही वाचा..खडसेंनी दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट, भाजपमध्ये खडसेंना मोठी जबाबदारी ?