मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावरून सध्या वातावरण पेटले आहे. येत्या २ ऑक्टोबरला मराठा समाजाच्या वतीने खासदार आमदाराच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. यातच भाजप खासदार उदयन राजे यांनी मराठा आरक्षण देणं नसाल तर सगळंच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
‘मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.
“मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजात प्रचंड रोष आहे. प्रत्येकाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळालं, त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही अॅडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा” असं उदयनराजे म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणावरून राज्यात सध्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच येणाऱ्या काळात मराठा आरक्षणाच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.