नवी मुंबई – नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. भाजपच्या नगरसेवकांविरोधात पोलीस बळाचा वापर करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी केला आहे. पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबईत भाजप नगरसेवकांवर दहशत निर्माण केली जात असल्याचं सांगितलं. महापालिका निवडणुकीपूर्वीच शहरात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. पोलीस बळाचा वापर करून नगरसेवकांवर दबाव आणला जात आहे. त्यांच्या जुन्या केसेस उकरून काढून त्यांना त्रास दिला जात आहे.
शहरात भयाचं वातावरण आहे. येथील वातावरण गढूळ झालं आहे. नगरसेवक आणि नागरिकांमध्ये भय निर्माण होऊ नये ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यानुषंगाने पोलिसांनी पावलं उचलवीत, असं सांगतानाच पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असं आवाहनही त्यांनी पोलिसांना केलं.