मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून शरद पवारांना खास शुभेच्छा देण्यात आल्या आहे. ‘पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो’, अशा शब्दात शिवसेनेने शरद पवारांना अग्रलेखातून शुभेच्छा दिल्या आहेत.
80 वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, हीच शुभेच्छा!, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.
सामनाचा अग्रलेख –
देशाचे सगळ्यात अनुभवी नेते, लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय आणि वैचारिक वारसदार शरद पवार हे आज रोजी 80 वर्षांचे झाले आहेत. कोविडचे संकट नसते तर श्री. पवार यांच्या 80 व्या वर्षपूर्तीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा झाला असता, त्यांचे अनेक नागरी सत्कार झाले असते, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असते. प्रशासनाचा दीर्घ अनुभव असलेल्या पवारांनी चाहत्यांच्या या उत्साहावर बंधने घातली आहेत. ‘जीवेत शरदः शतम्’ म्हणजे ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे 80 असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात, असे म्हणत पवारांच्या कामाचे कौतुक देखील शिवसेनेने केले आहे.
आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत. पवार स्वतःच ‘सह्याद्री’ बनून देशाचे नेते झाले आहेत.
50 वर्षांपेक्षा जास्त काळ पवार संसदीय राजकारणात आहेत. ते सर्वच निवडणुकांत अजिंक्य आहेत. पवारांना जनतेने भरभरून आशीर्वाद दिले. अर्थात हे आशीर्वाद ज्यांच्या बाबतीत सफल झाले अशा मोजक्या भाग्यशाली माणसांत शरद पवार आहेत. महाराष्ट्रातील काँगेस पक्षात खूप मोठे नेते मागच्या 70 वर्षांत निर्माण झाले, पण यशवंतराव चव्हाणांच्या उंचीचा नेता निर्माण झाला नाही. आजही लोक यशवंतरावांचेच स्मरण करतात. चव्हाणांनीच पवारांना घडवले. चव्हाणांनंतर त्यांच्याच तोलामोलाचा नेता म्हणून पवारांकडे पाहायला हवे.
राज्यातील ‘ठाकरे सरकार’ ही पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज आहे. 1962 च्या सुमारास युवक नेते म्हणून त्यांचा उदय झाला. पुलोदचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, काँग्रेस सोडलेले व पुन्हा राजीव गांधींच्या उपस्थितीत संभाजीनगरात सामील झालेले पवार आपण पाहिले. शरद पवार लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. पवारांच्या चातुर्यानेच वाजपेयींचे सरकार एका मताने पडले, पण संसदेतील या नेत्यास विश्वासात न घेता सोनिया गांधी राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा करायला गेल्या त्या अस्वस्थतेतूनवैचारिक मुद्द्यांवर काँग्रेस पुन्हा सोडणारे, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून पुन्हा काँग्रेसच्याच बरोबरीने स्वतंत्र बाण्याचे राजकारण करणारे शरद पवार देशाने पाहिले.
देशातल्या राजकारण्यांनी अनेक वर्षे फक्त ‘पवार विरोध’ हेच राजकारण केले. महाराष्ट्रात पवार विरोधकांना वेळोवेळी महत्त्वाची पदे वाटली गेली. पवार विरोधावर काँग्रेस पक्षातील तीन पिढ्या जगल्या हे कसले लक्षण मानायचे? हीसुद्धा पवारांची ताकदच म्हणायला हवी. देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले पवार हे आज विरोधी पक्षातले एकमेव सर्वात शक्तिमान नेते आहेत. पवार 80 वर्षांचे होत आहेत त्याचवेळी मोदींचे प्रचंड बहुमत असूनही लोकांच्या मनात अशांतता आहे. शेतकरी, कष्टकरी दिल्लीस वेढा घालून पंधरा दिवसांपासून बसला आहे. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कमजोर झाले आहे. लोकांना आकर्षित करील असे नेतृत्व आता उरलेले नाही. अशा वेळी महाराष्ट्रात भाजपचा उधळलेला घोडा रोखून शिवसेना, काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीची स्थापना करणारे, त्या सरकारचे नेतृत्व एका समझदारीने उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविणारे शरद पवार देशातील मोठ्या वर्गास आकर्षित करीत आहेत.
साताऱ्याच्या भरपावसातील सभेत विजेचा कडकडाट व्हावा तसे शरद पवार अवतरले. त्यांनी लहानसेच भाषण केले. त्या पावसाळी छायाचित्राने महाराष्ट्रात विजेचा संचार झाला. त्या सभेने त्यांच्या नेतृत्वाचा कसदार कंगोरा पुन्हा समोर आला.