मणगुत्ती येथे उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर बुधवारी शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याला गावातील एका गटाचा विरोध होता. शुक्रवारी रात्री पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटविण्यात आल्याने सीमाभागात संतापाची लाट उसळली होती. मात्र आता आठ दिवसांत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा प्रतिस्थापना करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
रविवारी महाराष्ट्रातही ठिकठिकाणी कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला होता. पुतळा हटविल्याने निर्माण झालेला तणाव अद्याप कायम असून, गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कर्नाटक मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र
सीमाभागाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पत्र पाठवून शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्याची मागणी केली होती.
रविवारी सकाळी अतिरिक्त पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी आणि हुक्केरीचे तहसीलदार व गावातील पंचांची बैठक झाली. त्यात आठ दिवसांत पुतळ्याची पुनर्स्थापना करण्याचा निर्णय झाला. दुपारनंतर बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनीदेखील मणगुत्ती गावाला भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांमध्ये मात्र रोष कायम आहे.